Monday, November 6, 2023

सुचेल तसं...........

।।स्वगत।।
सुचेल तसं.........
काही वेळा सगळं जगच बधीर वाटतं,
जगण्यासाठी खुणाच गवसत नाहीत.....,
विलक्षण एकलेपणा,
क्वचित तुटलेपणही......
अनंत कोस विस्तारलेल्या दाही दिशा.....
त्यातच...,
वाट दाखवणारा कोणीच नाही.
अधांतरी..... 
दिशाहीन
सगळंच निरर्थक..... 
अर्थशून्य......
उद्वेग, विषण्णता, वैफल्य,
आणि अकारण उदासीनता........
ही माझ्या दिशाची होणारी दशा.....
दिशा दर्शक बोटांची केव्हढी ही गरज...
या व्याकुळावस्थेतच,विभंग असताना.....
मी,मैत्रया ला वाचायला घेतो.......
मैत्रया.,
तूझे शब्दच मला स्वयंनिर्णयाने,
स्वेच्छेने सार्थ जीवन जगायला,
भयाकुलतेच्या अंधारात थेट उडी घ्यायला,
स्वातंत्र्याला निखळपणे जपायला,
सर्वांशी मैत्रिभाव जपायला....
एकूणच काय तर....
जीवनाच्या सगळ्या अंगाला क्षमा करत,
त्याला त्याच्या वेदनेसह शांत परिपक्च मनाने
स्वीकृत करायला शिकवितात....

मग मी आपलाअगदी शांत, शांत शांत....
मैत्रया,
तुझ्यातला एखादा अंश तरी मी समजू शकलो तरी.....
या भूतलावर येऊन काही तरी मिळाल्याचं सुख मिळेल.....

शिरीन "पार्थिव"
सहाअकरातेवीस 
नऊचाळीसरात्री...

Saturday, May 27, 2023

सुचेल तसं

 सुचेल तसं.


तुम्ही फक्त बदलणारे ऋतू पाहीले....

आणि......

मी बदलणारी माणसं.....

काय असतं जे की ऋतू

सारखे माणसे ही बदलत जातात....

जाणीवांच्या उणीवा बहुतेक....

किंवा.........

मग ज्यांची त्यांची प्रकृती की प्रवृत्ती....

 मग हे झाल्यावर काही एक    

 कळायला मार्ग नाहीय....


शिरीन"पार्थिव"

विसपाचतेवीससहातीस

Thursday, January 28, 2021

सैरभैर मन....

 काही वेळा मनात येतं...

अवकाशाच्या जाणीवेच्या,

आणि स्मरणाच्याही 

पलीकडे जायला हवंय....

विचारहीन अवस्था प्राप्त 

व्हायला हवी..

मनाची ...….......,

कारण..

तीच अवस्था "दिव्यसत्त्याकडे"

मार्गक्रमण करते....

आताशा 

असे मला फार फार वाटू लागलंय....

असं का?

किंवा का हे असं...?

ह्याच साठी ....,

विद्रोह,

ध्यान,

अध्यात्म,

बुद्ध.......

कृष्ण,

येशू,

की

अल्ला.....

ह्या विचारानं मन सैरभैर....

पण कळायला काहीएक मार्ग

नाहीय....

मनाची विचारहीन 

अवस्था कशी प्राप्त होईल...?

अन मग त्यानंतरही काय ?

अशा अनेक प्रश्नाची मालीका

अवतीभोवती सतत अविरत..... 

निरंतर.......!






(अपूर्ण)

शिरीन"पार्थिव"

दिनांक अठ्ठावीस जानेवारी एकवीस

पहाटे चार वाजता



सुचेल तसं...........

।।स्वगत।। सुचेल तसं......... का ही वेळा सगळं जगच बधीर वाटतं, जगण्यासाठी खुणाच गवसत नाहीत....., विलक्षण एकलेपणा, क्वचित तुटलेपणही...... अनंत ...